संत ज्ञानेश्वर यांची माहिती व कार्य | Information on Sant Dnyaneshwar | संत ज्ञानेश्वर चमत्कार | संजीवन समाधी म्हणजे काय? | संत ज्ञानेश्वर प्रसिद्ध ग्रंथ
Sant Dnyaneshwar Information in Marathi महाराष्ट्र राज्य ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. अनादि काळापासून या भूमीत अनेक थोर साधू-संत होऊन गेले. या संतांनी समाजातील तळागाळातील लोकांचे आध्यत्मिक प्रबोधन करून अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाणारा ज्ञानमार्ग दाखवला. त्यांनी पेटविलेल्या ज्ञानरुपी ज्योती संघर्षाच्या काळात प्रत्येकांच्या मनात आजही तेवत आहेत. संतांची शिकवण आजही आपल्याला जीवन जगताना वेळोवेळी मार्गदर्शन करीत असते. मराठी माणसाला अभिमान वाटावा अशी संत परंपरा महाराष्ट्राला लाभली आहे. केवळ महाराष्ट्रात नव्हे तर जगभरात त्यांचे ज्ञान सर्वत्र पसरले आहे. संत नामदेव, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर आणि समर्थ रामदास इत्यादी सारख्या कित्येकांच्या संत शिकवणी आपण लहानपणापासून आत्मसात करीत आहोत.
संत ज्ञानेश्वर यांची माहिती
संत ज्ञानेश्वर म्हणजे अध्यात्मिक क्षेत्रातील ‘न भूतो न भविष्यति’ असे अलौकिक चरित्र. ते महान संत व कवी होते. आज सुमारे ७४९ वर्षांनंतरही त्यांचे श्रद्धास्थान अनेक पिढ्यांपासून कायम आहे. आज संत ज्ञानेश्वर यांची माहिती व कार्य त्यांच्या जीवनातील काही प्रसंग, संत ज्ञानेश्वर प्रसिद्ध ग्रंथ, संत ज्ञानेश्वर चमत्कार आणि संजीवन समाधी इत्यादि माहिती पाहणार आहोत. (Sant Dnyaneshwar Information in Marathi).
संत ज्ञानेश्वर यांचे प्रारंभिक जीवन:
संत ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म इसवी १२७५ साली भाद्रपद महिन्यात, महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) जिल्ह्यामधील आपेगाव या गावात झाला. संत ज्ञानेश्वरांचे पूर्ण नाव श्री ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी असे होते. त्यांना ज्ञानदेव किंवा माऊली म्हणून देखील संबोधले जाते. त्यांच्या आईचे नाव रुक्मिणीबाई होते. त्यांचे वडील विठ्ठलपंत हे संसारात असतानाच त्यांनी संन्यास घेतला व ते काशीला गेले. काशीला गेल्यानंतर त्यांच्या गुरूंनी गृहस्थ कर्तव्ये पार पाडण्याची आज्ञा केली आणि त्यांनी विठ्ठलपंतांना पुन्हा गृहस्थाश्रमात (संसारात) पाठवले. पुन्हा गृहस्थाश्रमात आल्यानंतर विठ्ठलपंतांना चार मुले झाली. त्यांचे नावे निवृत्ती, ज्ञानदेव (ज्ञानेश्वर), सोपान आणि मुक्ताबाई असे होते. त्यापैकी निवृत्तिनाथ हे ज्ञानेश्वरांचे थोरले बंधू आणि सोपानदेव व मुक्ताबाई ही धाकटी भावंडे होती.
ज्ञानेश्वरांचे वडील विठ्ठलपंतांनी संन्यास सोडून पुन्हा संसारात प्रवेश केल्यामुळे 'संन्यासाची मुले' म्हणून समाज त्यांच्या कुटुंबाची तिरस्कार करीत असे. तत्कालीन ब्राह्मण पद्धतीनुसार ही घटना म्हणजे ती व्यक्ती संन्यासाचे ढोंग घेऊन पाखंडी म्हणून गृहस्थाच्या रूपात परतली होती. असे मानले जायचे. याच कारणाने पुढे समाजाने त्यांच्या कुटुंबाला वाळीत टाकले. समाजातून बहिष्कृत केल्यामुळे त्यांच्या कुटुंबियांना खूप कष्ट सोसावे लागले. ज्ञानेश्वर आणि त्यांच्या भावंडाना ब्राह्मण जातीतून बहिष्कार टाकला गेला. समाजाकडून होत असेलेली अवहेलना व दुर्दशा पाहून, आपल्या मुलांना छळमुक्त जीवन जगता येईल या आशेने प्रायश्चित्त म्हणून विठ्ठलपंतांनी आपल्या पत्नीसह इंद्रायणी नदीत उडी मारून देहत्याग केला. निवृत्तीनाथ, ज्ञानदेव, सोपानदेव आणि मुक्ताई अशी चार भावंडे आई-बापाविना पोरकी झाली.
आई-वडिलांच्या मृत्यूनंतरही ज्ञानेश्वर आणि त्यांच्या भावंडांना समाजाकडून फार त्रास दिला गेला. पुढे ज्ञानेश्वर आणि त्यांची भावंडे पैठणला गेली. तेथे ज्ञानेश्वरांनी स्वतःची विद्वत्ता सिद्ध केली. ते भिक्षा मागून ते आपला जीवन निर्वाह करीत असत. भिक्षा मागणाऱ्या या भाऊ बहिणींची कुशाग्र बुद्धी व शास्त्रज्ञान पाहून तेथील ब्राह्मण चकित झाले. त्यांनी विचार केला की आईवडिलांनी केलेल्या अपराधाचे दंड मुलांना देणे हे योग्य नाही. शेवटी १२८८ साली पैठण मधील ब्राह्मणांनी चारही भाऊ-बहिणींना शुद्ध करून पुन्हा समाजात सामिल केले. (Sant Dnyaneshwar Alandi).
संत ज्ञानेश्वर प्रसिद्ध ग्रंथ:
१. ज्ञानेश्वरी:
ज्ञानेश्वरी हा ग्रंथ भगवदगीतेचा मराठी भाषेमधील सोपा अनुवाद आहे. ग्रंथाला या ‘ज्ञानेश्वरी’ किंवा ‘भावार्थदीपिका’ असे देखील म्हटले जाते. ग्रंथाचे कार्य ज्ञानेश्वर महाराजांनी अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा येथे १२९० साली पूर्ण केले.
माझा मराठाचि बोलू कौतुके।
परि अमृतातेहि पैजासी जिंके।
ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन।।
असे म्हणत ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेविषयीचा अभिमान व मराठीची महती व्यक्त या ग्रंथात व्यक्त केली आहे. कर्मयोग, ज्ञानयोग व भक्तियोग यांचे विश्लेषण करून ज्ञानेश्वरी ग्रंथात सुमारे ९००० ओव्या आहेत.
२. अमृतानुभव:
‘अमृतानुभव’ किंवा 'अनुभवामृत' हा संत ज्ञानेश्वर रचित विशुद्ध तत्त्वज्ञानाचा ग्रंथ आहे. यामध्ये सुमारे ८०० ओव्या आहेत. ज्ञानेश्वरी मधील शिकवणुकीला आधारभूत तत्त्वज्ञानाची ओळख या अमृतानुभव ग्रंथांतून होते.
३. चांगदेव पासष्टी:
चांगदेव हे योगी १४०० वर्षे जगले असे मानले जात होते. मात्र एवढी वर्षे जगून देखील त्यांचा अहंकार गेला नव्हता. ज्ञानेश्वरांनी चांगदेवाला उपदेशपर लिहलेले ६५ ओव्यांचे पत्र म्हणजेच चांगदेव पासष्टी हा ग्रंथ होय. या ग्रंथात ज्ञानेश्वरांनी चांगदेवांचे गर्वहरण करून त्यांना उपदेश केला आहे.
४. हरिपाठ:
संत ज्ञानेश्वरांचा हरिपाठ यात हरिनामाचे महत्त्व सांगितले आहे. भगवंताच्या नामस्मरण करित मनुष्याने कसे जगावे? यावर भर दिला आहे. हरिपाठ या अभंग रचनेला वारकरी संप्रदायाला अन्यन साधारण महत्व आहे.
याशिवा, ज्ञानेश्वरांनी विठ्ठल आणि कृष्ण भक्तीवर असंख्य अभंग आणि ओव्या रचल्या आहेत. (Sant Dnyaneshwar Abhang).
संत ज्ञानेश्वरांचे चमत्कार:
संत काळात अनेक चमत्कार झालेले आपणास ऐकण्यात व वाचण्यात येतात. संतांनी केलेले चमत्कार आजही सहजासहजी बुद्धीच्या पलीकडील आहेत. त्यांनी केलेले चमत्कार हा एक संशोधनचा विषय असू शकेल. अध्यात्मात ओव्या, अभंगातून काव्यात्मक बोलणं कधी कधी शब्दशः अर्थाने देखील घेतले जाते. संत ज्ञानेश्वर माऊलींनी असंख्य चमत्कार घडविले त्यापैकी त्यांच्या निवडक चमत्कारिक कथा खालीलप्रमाणे (संत ज्ञानेश्वर चमत्कार):
१. रेड्याच्या मुखातून वेद वदविले
ज्ञानेश्वर माऊली आणि त्यांची भावंडे शुद्धिपत्रक मागण्यासाठी पैठणमध्ये गेले असता, शाश्त्र पंडिताने वेद, उपनिषदे, पुराणे ह्यांचे संदर्भ देत संन्याशांच्या मुलांसाठी शुद्धीकरणासाठी कोणताही विधी नाही असे सांगितले. काही केल्या त्या भावंडांना अनुकूल निष्कर्ष निघत नव्हता.
तेव्हा जवळच एक माणुस आपल्या रेड्याला निर्दयीपणे मारत होता. ज्ञानेश्वरांना ते पाहवले नाही. त्यांनी रेड्याच्या मालकाला मारणे थांबवण्याची विनंती केली. त्यावर तेथील धर्मपंडिताने ज्ञानदेवांना त्या रेड्याचा आणि तुझा आत्मा एकच आहे का? असे विचारले असता, ज्ञानेश्वर माऊली म्हणाले, "या सृष्टीतील सगळे जीव पवित्र आहेत आणि सगळ्याच जीवांमध्ये तेच परब्रह्म वास करतात. त्यामुळे माझा आणि रेड्याचा आत्मा देखील एकच आहे.'' यावर तेथील पंडितांनी त्यांची खिल्ली उडवून, माऊलींचा आणि रेड्याचा एकच आत्मा कसा ते सिद्ध करण्याचे आवाहन केले. तेव्हा संत ज्ञानेश्वरांनी रेड्याच्या मस्तकावर हात ठेऊन वेद उच्चारण्याची आज्ञा केली. त्या वेळी रेड्याच्या मुखातून ऋग्वेदाचे ध्वनी बाहेर पडले.
२. ज्ञानेश्वर महाराजांनी भिंत चालवली
ज्ञानेश्वरांच्या काळात एक चांगदेव नावाचे महान योगी होते. ते १४०० वर्ष जगले असे सांगितले जायचे. लहानपणी अनेक साधना करून त्यांनी अनेक दिव्य शक्ती आणि सिद्धी प्राप्त केल्या होत्या. मात्र त्यांनी इतकी तपचर्या करून देखील आत्मिक समाधान मिळाले नव्हते.
चांगदेव आळंदीत असताना संत ज्ञानेश्वर आणि त्यांच्या भावंडांची कीर्ती त्यांच्या पर्यंत पोहोचली होती. त्यामुळे ज्ञानेश्वर माऊलींना त्यांना भेटण्याची तीव्र इच्छा झाली. त्यांनी ज्ञानेश्वरांना भेटीसाठी पत्र लिहायचे ठरवले. पत्र लिहायला घेताना त्या पत्रावर मायना काय लिहावा? हे त्यांना कळेना. कारण ज्ञानेश्वर तरुण योगी होते. त्यांना आपल्या बरोबर समजावे की लहान? की मोठा? त्यामुळे त्यांनी कोरेच पत्र ज्ञानेश्वरांना पाठवले. ज्ञानेश्वरांकडे ते पत्र पोहचले. कोरे पत्र पाहून सर्व भावंडांना आश्चर्य वाटले. तेव्हा मुक्ताई ज्ञानेश्वरांना म्हणाली. "दादा, इतके वर्ष तापचर्या करून देखील चांगदेव कोरेच राहिले"
ज्ञानेश्वरांनी त्या कोऱ्या कागदावर उत्तरादाखल ६५ ओव्या लिहून पाठवल्या. त्या ओव्यांमध्ये विविध दाखले देऊन जगात भगवंतांच्या अस्तित्वाचे प्रमाण दिले होते. चांगदेवांना ते पत्र वाचून फार समाधान वाटले. त्यांच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे त्यांना आता सापडली होती. त्यांनी ज्ञानेश्वर माऊलींना आपले गुरू बनविण्याचे ठरवले. त्याप्रमाणे ते ज्ञानेश्वरांना भेटण्यासाठी निघाले.
भेटीला जाताना चांगदेवांना आपली शक्तिप्रदर्शन करण्याचा मोह आवरला नाही. आपण किती मोठे योगी आहोत हे दाखवण्यासाठी ते ज्ञानेश्वरांच्या भेटीसाठी एका वाघावर स्वार झाले. हातात चाबूक म्हणून त्यांनी जिवंत साप धरला होता. असंख्य शिष्यांच्या लवाजम्यासह ते ज्ञानेश्वरांच्या भेटीसाठी निघाले.
वाघावर बसून चांगदेव आपल्या भेटीसाठी येत आहेत. ही गोष्ट ज्ञानेश्वरांना कळली. एवढा महान योगी आपल्या भेटीसाठी येतोय म्हटल्यावर त्यांनी त्याच्या स्वागतासाठी पुढे जायचे ठरवले. त्यावेळेस ती सर्व भावंडे एका पडीक भिंतीवर गप्पा मारत बसले होते. ज्ञानेश्वरांनी भिंतीला इशारा करताच ती निर्जीव भिंत हवेत तरंगून चांगदेवांच्या दिशेने उडू लागली. ती भिंत चांगदेवासमोर खाली येऊन थांबली. आणि ज्ञानेश्वर आणि भावंडे भिंतीवरून खाली उतरले.
चांगदेव महाराज हे दृश्य पाहून गहिवरले. त्यांनी वाघासारख्या सजीव प्राण्यावर नियंत्रण मिळवले असले तरीही एका निर्जीव भिंतीला गतिमान करणे हे त्यांच्या अव्याकाच्या बाहेर होते. ही गोष्ट त्यांना कळली आणि त्यांचा संपूर्ण अहंकार गळून पडला. त्यांनी ज्ञानेश्वर महाराजांसमोर लोटांगण घातले. चांगदेवांनी आपला गुरू होण्याची विनवणी ज्ञानेश्वर माऊलींनी केली. ज्ञानेश्वरांनी त्यांना मुक्ताईचा शिष्य होणास सुचवले. कारण त्यांनी पाठविलेल्या कोऱ्या पत्रावरून मुक्ताईला त्यांच्या मनाची अवस्था कळली होती. चांगदेवांनी मुक्ताईला आपले गुरू केले.
३. पाठीवरचे मांडे
ज्ञानेश्वर आणि त्यांची भावंडे अभंग, ओव्या रचून लोकांमध्ये ईश्वर गोडी निर्माण करीत असे. त्यांच्या रसाळ वाणीने सर्वसामान्य लोकांना भक्तीचा आणि आध्यात्माचा मार्ग शिकवीत असत. पण काही लोकं, ज्यांनी
कधीकाळी 'संन्यासाची मुले' म्हणून हिणवले होते तीच इतकी अलौकिक निघाली हे त्यांना पचनी पडत नसे. याच लोकांपैकी एक विसाजी पंत नावाचे सावकार होते. ते नेहमी ज्ञानेश्वर आणि त्यांच्या भावंडांचा द्वेष करित असत.
एके दिवशी ज्ञानेश्वरांचे मोठे बंधू निवृत्तीनाथांना मांडे खाण्याची इच्छा झाली होती. मांडे हा पदार्थ मातीच्या खापरावर किंवा माठावर थापुन बनवतात. मुक्ताई मातीचे खापर घेण्यासाठी कुंभारांकडे गेली. विसाजीपंत सावकारांनी सर्व दुकानदारांना या चारही भावंडांना काहीही द्यायचं नाही अशी सक्त ताकीद देऊन ठेवली होती. त्यामुळे मुक्ताईला कोणीही मांडे बनविण्यासाठी खापर दिले नाही. ती फार दुःखी होऊन घरी परतली. मुक्ताईचा दुःखी चेहरा पाहून ज्ञानेश्वर महाराजांनी याचे कारण विचारले. मुक्ताई ने सर्व घडलेला प्रकार ज्ञानेश्वरांना सांगितला.
ज्ञानेश्वर म्हणाले “बस एवढीशी गोष्ट? तू तयारी कर, दादासाठी आपण छान मांडे तयार करूयात."
मुक्ताई पटापटा तयारीला लागली. तयारी झाल्यावर तिने ज्ञानेश्वरांना विचारले, "दादा! कुठे आहे खापर, मी मांडे कशावर थापू?"
ज्ञानेश्वर म्हणाले “थाप माझ्या पाठीवर.” असं म्हणुन ज्ञानेश्वर ओणवे झाले. ज्ञानेश्वरांनी योगसामर्थ्याने पाठ तापवली. गरम होऊन ती लालेलाल झाली. मुक्ताईने आनंदाने ज्ञानेश्वरांच्या पाठीवर मांडे थापले.
हा सगळा प्रकार विसाजीपंत सावकार लपुन खिडकीतुन पाहत होते. खरं तर मुक्ताईला खापर मिळालं नाही म्हणून ते तीची गम्मत पाहण्यासाठी लपून छपून तिच्या मागे आले होते. परंतु, ज्ञानेश्वर माऊलींची डोळे देखत ती अगाध लीला पाहुन ते जागीच स्तब्ध झाले. ही चारही भावंडे खरंच अलौकिक व दिव्य आहेत याची त्यांना खात्री पटली. त्यांनी दिलेल्या त्रासाचा आता त्यांना पश्चाताप झाला होता. त्यांनी त्या भावंडांची हात जोडून क्षमा मागितली. पुढे त्यांनी भक्ती मार्ग अवलंबून आत्मिक ज्ञान प्राप्त केले. हेच विसाजी पंत पुढे संत विसोबा खेचर म्हणून नावारूपास आले आणि याही पुढे जाऊन ते संत नामदेवांचे गुरु बनले.
संत ज्ञानेश्वरांची संजीवन समाधी:
वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी संपूर्ण विश्वाला तत्वज्ञाचे धडे शिकवणारे संत ज्ञानेश्वर महाराजांनी आपला संजीवन समाधी घेण्याचा दिवस निश्चित केला होता. भगवंताने सोपवलेले कार्य पूर्ण झाले असे त्यांना वाटू लागले. त्यासाठी गुरु, वडीलबंधू निवृत्ती नाथांची अनुज्ञा मागितली. जड अंतःकरणाने त्यांनी ती मान्य केली. आळंदी हे स्थान निश्चित झाले. कार्तिक वद्य त्रयोदशी, गुरुवारी माध्यनकाली संजीवन समाधी घेण्याचा दिवस ठरला. तो दिवस उजडू नये असे तेथील प्रत्येकाला वाटत होते. कारण त्यानंतर ज्ञानेश्वर माऊली पुन्हा कोणाच्या दृष्टीस पडणार नव्हते. टाळ, मृदुगांनी संपूर्ण परिसर दुमदुमला होता. प्रथम माऊलींनी इंद्रायणी नदीमध्ये स्थान केले. अंगाला चंदनाची उटी लावली. संत नामदेवांनी त्यांच्या गळ्यात फुलांच्या माळा घातल्या. माऊलींनी सर्वांची गळाभेट केली. निवृत्तीनाथांनी ज्ञानदेवांना हाताला धरून विवरात नेले. विवरातील आसनावर बसवले व आले. माऊलींनी डोळे मिटले आणि १०९ ओव्यांनी भगवंतांची स्तुती केली व ध्यान कारायला सुरवात केली. निवृत्तीनाथांनी विवरावर शिळा बसवली. बंद झालेल्या शिळेवर सर्वांनी फुले वाहिली आणि माऊलींचा शेवटचा निरोप घेतला. त्यावेळी सर्वत्र दुःखाचा कडेलोट झाला होता.
संजीवन समाधी म्हणजे काय?
समाधी अवस्था येणं मोठी भाग्याची गोष्ट असते. मनुष्य जन्माला येतो आणि त्याचा मृत्यू होतो. मृत्यनंतर त्याच्या शरीराचे पंचभूतांमध्ये विलीनीकरण होते. त्यानंतर त्याचं दुसऱ्या रूपाने प्रगतीकरण होते. यालाच जन्म मृत्यूचा लपंडाव म्हणतात. असे मानले जाते. हा जन्म-मृत्यूचा लपंडाव अनादिकाळापासून चालू राहतो. ऋषी मुनींनी जिवंतपणात स्वतःला समाधिस्त करून घेतले. समाधी घेतल्यानंतर त्या ऋषी मुनींच्या देहाचे विलीनीकरण पंचमहाभूतात होते. ही प्रक्रिया झाली जिवंत समाधीची. आता संजीवन समाधी म्हणजे काय ते पाहुयात.
संजीवन म्हणजे वर्षनुवर्षे आहे त्या स्थितीत असणे. त्यावर वाहिलेली फुले, फळे, प्रसाद जसाचे तसा राहतो. त्या समाधीला संजीवन समाधी म्हणतात. त्या समाधीचे चैतन्य अनंत काळापर्यंत टिकून राहते. संजीवन समाधीतून विश्वाच्या गरजेप्रमाणे संतांचे पुन्हा-पुन्हा प्रकटीकरण होत असते. ज्याचे पंच महाभूतात विलीनीकरण होत नाही. ज्या व्यक्तीची समाधी सदोदित भक्तांना कृपा अनुभव देत राहते. ती संजीवन समाधी होय. (Sant Dnyaneshwar Mahiti).
संत ज्ञानेश्वर प्रश्न-उत्तरे:
१. संत ज्ञानेश्वर पूर्ण नाव काय?
उत्तर- संत ज्ञानेश्वर यांचे पूर्ण नाव ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी होय.
२. संत ज्ञानेश्वर यांच्या आईचे नाव काय होते?
उत्तर- संत ज्ञानेश्वरांच्या आईचे नाव रुक्क्मणीबाई होते.
३. ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म कुठे झाला?
उत्तर - संत ज्ञानेश्वरांचा जन्म संभाजी नगर (औरंगाबाद) येथील आपेगाव या गावात झाला.
४. संत ज्ञानेश्वर यांचे गुरु कोण होते?
उत्तर - संत ज्ञानेश्वर यांचे गुरु त्यांचे थोरले बंधू निवृत्तिनाथ होते.
५. संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी कोणत्या भाषेत लिहिली?
उत्तर - ज्ञानेश्वरी हा ग्रंथ भगवदगीतेचा मराठी अनुवाद होता.
६. संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी कोठे लिहिली?
उत्तर - संत ज्ञानेश्वरांनी अहमदनगर जिल्ह्यातील नेवासे या गावात ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिला.
७. ज्ञानेश्वर महाराज समाधी कधी घेतली?
उत्तर - आळंदी येथे इंद्रायणी नदीच्या काठी कार्तिक वद्य त्रयोदशी, शके १२१८, (इ. स. १२९६) गुरुवार रोजी संजीवन समाधी घेतली.
८. संत ज्ञानेश्वरांची समाधी कोठे आहे?
उत्तर - संत ज्ञानेश्वरांची संजीवन समाधी आळंदीतील सिद्धेश्वर मंदिराच्या परिसरात आहे.
या पोस्ट देखील तुम्हाला आवडू शकतात
• माझा आवडता संत निबंध (संत तुकाराम)
0 टिप्पण्या