Sant Eknath Information in Marathi महाराष्ट्र भूमी ही संतांची आणि वीरांची भूमी म्हणून ओळखली जाते. आज जवळपास सातशे वर्षानंतरही संत साहित्याची गोडी तसूभरही कमी झालेले दिसत नाही. उलट काळाच्या ओघात ती वाढत असल्याचा प्रत्यय येतो. संत साहित्य हे भारतीय संस्कृतीचे मूळ आहे. संतानी आपल्या वाणी आणि लेखनीतून लोकांना योग्य मार्गदर्शन केले. त्यांनी समाजात राहून लोकोउद्धराचे निरंतर कार्य केले. महाराष्ट्राच्या संत परंपरेत संत एकनाथांचे कार्य मोलाचे मानले जाते. संत एकनाथ महाराजांचे कार्य खूप महान आहे. महाराष्ट्रात भागवत धर्माची ध्वजा ज्याने फडकवत ठेवली असा महान संत पुरुष म्हणजे संत एकनाथ होय. (Sant Eknath Information in Marathi).

संत एकनाथ महाराजांची माहिती Sant Eknath Information in Marathi | संत एकनाथ महाराजांचे भारुड |  संत एकनाथ प्रसिद्ध अभंग | संत एकनाथ यांचे कार्य |  संत एकनाथ महाराजांचे पूर्ण नाव | संत एकनाथ यांचे आडनाव | संत एकनाथांचा जन्म कोठे झाला | संत एकनाथ प्रसिद्ध सुवचन

न्या. रानडे यांनी 'हे खरे महाराष्ट्राचे नाथ होत!' म्हणून संत एकनाथांचा गौरव केला आहे. आपली वाणी आणि लेखणीने भागवत धर्माचा संदेश त्यांनी समाजाच्या वेगवेगळ्या थरात पोहचवला. जातीपातीच्या सीमा ओलांडून त्यांनी मानवी जीवनमुल्यांचा त्यांनी प्रसार केला. भक्ती मार्गाची खरी ओळख पटवून देऊन त्यांनी खऱ्या अर्थाने महाराष्ट्र संस्कृतीची मुहूर्तमेढ रोवली. भागवत संप्रदायाची उभारणी करण्यासाठी त्यांनी आपले आयुष्य वेचले. म्हणूनच संत बहिणाबाई म्हणतात, "जनार्दनी एकनाथ खांब दिला भागवत".

संत एकनाथ महाराजांचे प्रारंभिक जीवन आणि कार्यकाळ

संत एकनाथांचा जन्म इ.स १५३३ साली (शके १४५५) मध्ये मराठवाड्यातील पैठण येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव सूर्यनारायण व आईचे नाव रुक्मिणी होते. एकनाथांचे आडनाव पैठणकर होते. लहानपणीच आई-वडिलांचे निधन झाल्यामुळे एकनाथांचा सांभाळ त्यांच्या आजोबा आजीने केला. नाथांच्या घराण्यात पिढ्यानपिढ्या पासून पूजा पाठ, सूर्योपासना आणि विठ्ठल भक्तीची परंपरा होती, भक्तिभाव होता. त्यामुळे ईश्वरभक्तीचे संस्कार लहानापासून त्यांच्यावर रुजू झाले होते. गावातील शिव मंदिरात ते बराच वेळ नामस्मरण करण्यात घालवीत असत. अध्यात्मिक प्रगती करण्यासाठी आपल्या गुरूचा शोध घेण्यासाठी ते दौलताबादला पोहचले. त्यावेळी जनार्दन पंत यांनी अध्यात्मिक क्षेत्रात बरीच प्रगती केली होती. एकनाथांना त्यांची प्रचिती आली होती. त्यांनी जनार्दन पंतांना आपले गुरू व्हावे म्हणून विनवणी केली. त्यांची मनस्वी सेवा केली. त्यावेळी ते केवळ बारा वर्षाचे होते. जनार्दन पंतांनी एकनाथांना गुरूपदेश दिला. तेथे राहून एकनाथांनी आत्मचिंतन केले. तेथे त्यांनी अनेक ग्रंथांचे वाचन, कृष्ण भक्ती आणि आत्मचिंतन केले. जनार्दन पंत आणि नाथांनी मिळून तीर्थयात्रा केली. तिर्थयात्रेत नाथांनी चतुःश्लोकी भागवत हा त्यांचा पहिला ग्रंथ लिहिला. (संत एकनाथ काळ).

तीर्थयात्रेहून पुन्हा पैठणला परतल्यावर एकनाथांचा विवाह झाला. त्यांच्या पत्नीचे नाव गिरीजा होते. त्यांना हरिपंडित हा मुलगा आणि गंगा व गंगाया या मुली झाल्या. गृहस्थाश्रमात राहून त्यांचे भजन, कीर्तन, प्रवचन आणि काव्य लेखन सुरू होते. संत ज्ञानेश्वरांबद्दल त्यांच्या मनात नितांत आदर होता. आळंदीतील त्यांच्या समाधीचा नाथांनी जीर्णोद्धार केला. सर्वसामान्य लोकांना परमेश्वर गोडी लावण्याची वृत्ती त्यांनी रचलेल्या सहित्यातून स्पष्ट होते. संत ज्ञानेश्वरांनंतर जवळपास सुमारे तीनशे वर्षांनी एकनाथांचा कालखंड येतो. संत ज्ञानेश्वर व संत नामदेव यांच्यापेक्षा एकनाथांच्या काळात परिस्थिती अधिक बिकट होती. अज्ञान आणि अंधश्रद्धेचा विळखा समाजाला पडला होता. मराठी भाषा आणि मराठी संस्कृतीची गळचेपी होत होती. परकीय आक्रमणामुळे असंख्य देवळे नष्ट झाली होती. अशा परिस्थितीत हिंदूंची धर्म भावना जागृत करून जीवनाची मूलभूत तत्वे समाजाला सोप्या सांगून, संत एकनाथांनी लोकांना भक्ती मार्गाचे महत्त्व पटवून दिले. (संत एकनाथ महाराजांचे पूर्ण नाव).

संत एकनाथांचे साहित्य

निद्रिस्त समाजाला जागृत करण्यासाठी संत एकनाथांनी अनेक ग्रंथाची निर्मिती केली. संत एकनाथांनी आपले विचार समाजात पोहचविण्यासाठी विविध पद्धतीची योजना केली. पंडित आणि विद्वानांसाठी चतुःश्लोकी भागवत आणि एकनाथी भागवत तर मध्यमवर्गीय लोकांसाठी रुक्मिणी स्वयंवर, भावार्थ रामायण यांचे लेखन केले. सर्व सामान्य लोकांसाठी त्यांनी असंख्य भारुडे, अभंग, पदे, गौळणी यांची रचना केली. संत एकनाथांचे एक संस्मरणीय साहित्यिक कार्य म्हणजे ज्ञानेश्वरीचे संशोधन. ज्ञानेश्वरी या ग्रंथामध्ये अनेक अपपाठ शिरले होते. त्यांनी ज्ञानेश्वरी ग्रंथाचे शुद्धीकरण केले. ज्ञानेश्वरांचे समाधीस्थान नामशेष झाले होते. त्यांनी समाधीचा जीर्णोद्धार केला. ज्ञानेश्वरीचे संशोधन आणि समाधीचा जीर्णोद्धार अशी दोन महत्वाची कार्ये संत एकनाथांनी केली.

चतुःश्लोकी भागवत:

संत एकनाथ स्वामी तीर्थयात्रा करत असताना गुरू जनार्दन स्वामींच्या आज्ञेने चतुःश्लोकी भागवत हा ग्रंथ लिहला. हा एकनाथांनी लिहलेला पहिला ग्रंथ होय. भागवताच्या दुसऱ्या स्कंधातील काही विशिष्ट श्लोकांवर केलेले भाष्य या ग्रंथामध्ये आहे. चतुःश्लोकी भागवत या ग्रंथांमधून परमेश्वर चराचरात वसलेला आहे असा उपदेश एकनाथांनी केला आहे.

एकनाथी भागवत:

चतुःश्लोकी भागवत ग्रंथांच्या लेखनानंतर जनार्दन स्वामींनी भागवताच्या ११ व्या स्कंधातील भाष्य लिहिण्याची आज्ञा केली. हा ग्रंथ लिहिण्यास नाथांना तीन वर्षे लागली. ग्रंथामध्ये भागवत धर्माचे तत्वज्ञान नाथांनी मराठीत केले आहे. गुरूभक्ती, गुरुविषयी वाटणारा आदर भक्तीचे महत्व हे विषय या ग्रंथात आहेत.

रुक्मिणी स्वयंवर:

रुक्मिणी स्वयंवर हे एकनाथांनी रचलेले पहिलेच काव्य होय. वेदांताचे सार या आख्यान काव्यात केले आहे. रुक्मिणी हरण, युद्ध वर्णन, विवाह समारंभ वर्णन असे या काव्याची विभागणी केली आहे. हे काव्य अतिशय लोकप्रिय झाले. ही एक कृष्ण कथा असल्याने भाविक यामध्ये रमून जातो.

भावार्थ रामायण:

एकनाथांनी त्यांच्या अखेरच्या काळात हा ग्रंथ लिहला. या ग्रंथाची पाच कांडे एकनाथांनी लिहले आहेत तर त्यापुढील भाग एकनाथांच्या मृत्यूनंतर त्यांचा शिष्य गावबा यांनी लिहून पूर्ण केला. या ग्रंथामध्ये राम आणि सीता यांच्या एकरूपते मधून भक्तीचे तत्वज्ञान सांगून, समाजाला मार्गदर्शन केले आहे.

संत एकनाथ महाराजांचे भारुड

संत एकनाथांची लोकप्रिय रचना म्हणजे भारुड. भारुड म्हणजे लोकांच्या जीवनातील विविध गोष्टींवर आध्यात्मिक रूपक देऊन नाट्यपूर्ण केलेले गीत. संत एकनाथांनी भारुडे, पदे, अभंग, गौळणी आधी परंपरेने चालत आलेल्या लोक वाङ्ममय प्रकारांची निर्मिती नाथांनी विपुल प्रमाणत केली आहे. नाथांच्या भारुडात ज्योतिषी, गोंधळी, जागल्या,फकीर, भोपे, वासुदेव, वाघ्यामुरळी इत्यादी विविध व्यवसाय करून आपली करणारे त्याचप्रमाणे पशु-पक्षी देखील आहेत. शिवाय भारूडामध्ये हमामा, पिंगा, फुगडी इ. क्रीडा प्रकारही आहेत. नाथांनी या सर्वांच्या स्वभावातील हालचाली, बोलण्या चालण्यातील वैशिष्ट्य बारकाईने टिपून त्यांना परमार्थाच्या सूत्रात गुंफून भारुड रचना केली आहे. विविध सण-समारंभ आणि त्यातील विधी, लपंडाव, टिपरी, फुगडी, हुतूतू, यांसारखे खेळ किंवा होळी-शिमगा सारख्या सणांवर नाथांनी रचलेली अध्यात्मिक रूपके लोकजीवनाला दिशा देणारी आहेत. त्यामुळे भारुड म्हंटल की संत एकनाथ महाराज असा ठसा जनमानसात उमटला.

'विंचू चावला' हे संत एकनाथ महाराजांचे प्रसिद्ध भारुड आहे. या भारुडमधील विंचू हे 'काम' व क्रोध या विकारांचे प्रतीक आहे. काम म्हणजे इच्छा आणि क्रोध म्हणजे राग. अमर्यादित इच्छा आणि क्रोध यामुळे माणसाचे जीवन दूषित होते. कामक्रोधाची बाधा झाली की माणूस विंचू चावल्याप्रमाणे बेताल वागू लागतो. त्यावर उपाय म्हणजे कामक्रोधांनी बाधित झाल्यावर स्वत्वगुणांचा आश्रय घ्यावा. यांसारखे अनेक मोलाचे उपदेश संत एकनाथांनी आपल्या भारुडातून दिले. (संत एकनाथ महाराजांचे भारुड).

संत एकनाथ प्रसिद्ध अभंग

संत एकनाथ महाराजांचे कार्य खूप महान आहे. त्यांचे अभंग प्रासादिक आहेत. नाथांचे अभंग हे साधकासाठी शोधदिपकाप्रमाणे मार्गदर्शक ठरतात. संत एकनाथांचे काही निवडक प्रसिद्ध अभंग आणि त्यांचे अर्थ खालीलप्रमाणे,

काळाने प्रासिले सावध व्हा रे । सोडवण करा रे हरिनामे । १।।

आयुष्य सरलीया कोण पां सागती। पुढे हो फजिती यमदंड ।॥२॥।

उपाय तो सोपा नामाचा गजर । न करी विचार पुढे काहीं ।३ ।।

एका जनार्दनीं तूं का रे अंधळा। देखतोसी डोळां सुख दुःख।॥४ ॥।

संत एकनाथ महाराज म्हणतात काळाने तुम्हाला गिळळले असून तुम्ही सावध व्हा. हरिनाम स्मरण करून तुम्ही आपली सोडवणूक करा. आयुष्य संपल्यानंतर कोण बरे संगतीला आहे. नामाचा गजर सोपा असून दुसरा विचार करू नको, नाथ महाराज मनुष्याला म्हणतात की, जीवन काळामध्ये आपण सुख दुःख पाहतो तरीही आपण आपल्या जीवनात अज्ञानी राहिलो तर त्या गोष्टीचा उपयोग होणार नाही. म्हणून जीवन प्रवासात हरी नामस्मरण हा उपाय सोपा असून परमेश्वर प्राप्तीचे ते एक साधन आहे.

---

अल्प आयुष्य नरदेही जाण । काही तरी भजन करी वाचे ।९॥।

जाणार जाणार नरदेह जाणार । न चुके वेरझार जन्ममृत्यू ।।२।।

करी धंदा आठवी गोविंदा । वायां तूं आपदा नको घेऊ ।।३।॥।

एका जनार्दनी पंढरी पाहुन । तेथें न करी मने ठेवणे देखा ।।४ ॥।

संत एकनाथ महाराज म्हणतात नरदेहाला आयुष्य कमी आहे म्हणून वाणीने भगवंताचे भजन करा. नरदेह जाणार असून जन्म मृत्यूचे येणे - जाणे चुकवता येणार नाही. जन्म मृत्यूचे येणे - जाणे चुकवायचे असल्यास भगवंताचे स्मरण सतत ठेवायला पाहिजे, आपण व्यवहारातील कार्य करत असताना सुद्धा भगवंताचे स्मरण ठेवायला हवे. व्यर्थ गोष्टी मध्ये वेळ घालून संकटे ओढून घेऊ नये. पंढरीच्या पांडुरंगाला पाहून पांडुरंगावर मन स्थापन करावे.

भगवंत प्राप्तीसाठी साधकाने मन भगवंतावर स्थापन करावे, मन भगवंतावर स्थापन होण्यासाठी भगवंताचे स्मरण ठेवायला हवे म्हणजेच भगवंताचे अनुसंधान ठेवायला हवे असा मोलिक संदेश संत एकनाथ महाराज आपल्या अभंगातून साधकाला देतात.

---

देहाचिये माथा काळाची तो सत्ता । म्हणोनि सर्वथा घोका राम ।॥९॥।

आदि मध्य अंती काळ लागलाहे । क्षणक्षणां पाहे वास त्यासी ।।२।।

सर्व जाणोनियां अंधळे पैं होती । काळ नेतांचि देखती ते दुजा ।॥३।।

परि रामनामी न धरिती विश्वास । निकट समयास धावाधावी ।।४।।

एका जनार्दनी भुलले ते प्राणी । तया सोडवणी कोण करी ।।५।।

संत एकनाथ महाराज म्हणतात, देहाच्या डोक्यावर काळाची सत्ता आहे. म्हणून तुम्ही सर्वप्रकारे रामनामाचे स्मरण करत चला. बाल तरुण आणि वृद्ध अवस्थेमध्ये काळ पाठीमागे लागला आहे. काळाचे वास्तव क्षणाक्षणाला आहे.  दुसऱ्याला काळ नेताना पाहून मनुष्य आंधळा होतो. दुसऱ्याला काळ नेताना मनुष्य पाहतो. पण तरी सुद्धा राम नावावर विश्वास ठेवला नाही तर अशा मनुष्यास अंत काळी कोण मुक्त करील.

जीवन प्रवास हा क्षणिक आहे. काळ कधी येईल सांगता येत नाही. म्हणून राम नावावर विश्वास आणि निष्ठा ठेवली पाहिजे. साधकाने नामस्मरण हे निष्ठेने केले पाहिजे हे एकनाथ महाराजांना अभिप्रेत आहे. (संत एकनाथ प्रसिद्ध अभंग).

या पोस्ट देखील तुम्हाला आवडू शकतात

• माझा आवडता संत निबंध (संत तुकाराम)

• संत ज्ञानेश्वर यांची माहिती

• डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची माहिती

• माझी आई मराठी निबंध

• नदीची आत्मकथा मराठी निबंध